आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र घोराड येथे भाविकांची मांदियाळी; महापुजा, पालखी सोहळा व फराळाचा कार्यक्रम
राजेश वरटकर
मुख्य संपादक
विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे आषाढी एकादशीनिमित्त उद्या हजारो भाविकांची मांदियाळी जमणार आहे. बोर नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या या संतभूमीत विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिभावाने परिसर दुमदुमुन जाणार आहे.
श्रीक्षेत्र घोराड ही श्री संत केजाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र श्री संत नामदेव महाराज या दोन महान संतांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेली भुमी आहे. दोन्ही संत विठ्ठलभक्त होते. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नागपुरचे राजे रघुजी भोसले यांच्या काळात येथे बोर नदीकाठी भव्य श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी करण्यात आली. श्री संत केजाजी महाराज यांनी पंढरपूरहून पायी वारी करून श्री विठ्ठल-रखुमाईची मुर्ती पाठीवर बांधुन घोराड येथे आणल्याची अख्यायिका आजही भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे.
याच परंपरेमुळे आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरला जाऊ न शकणारे विदर्भातील हजारो वारकरी आणि भाविक घोराड येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे श्रीक्षेत्र घोराडला “विदर्भाचे पंढरपुर” अशी ओळख प्राप्त झाली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त उद्या पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची महापुजा व अभिषेक होणार असून सकाळी ८ वाजता महाआरती व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर श्री संत केजाजी महाराजांच्या पालखीची मंदिर परिसरात प्रदक्षिणा होईल. दुपारी १२ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ होऊन पंचक्रोशी प्रदक्षिणा पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात येईल. यानंतर उपस्थित भाविकांना उपवासाचा फराळ प्रसाद म्हणुन वितरित करण्यात येणार आहे.
भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी विदर्भभरातुन भाविक श्रीक्षेत्र घोराडकडे दाखल होत असुन, बोर नदीचा तीर पुन्हा एकदा विठ्ठलनामाच्या अखंड गजराने दुमदुमणार आहे.

