शिवशाही न्युज नेटवर्क
घोराड : श्री क्षेत्र घोराड येथील ह.भ.प. हरिदास महाराज महाकाळकर यांनी श्री संत केजाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेली घोराड ते पंढरपुर पायदळ वारी यंदाही भक्तिभावाने पुर्ण केली. सुमारे नऊ वर्षांपुर्वी या पायदळ वारीची सुरुवात करण्यात आली होती. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत वारीला खंड पडला असला, तरी त्यानंतर दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरपर्यंत पायी वारी काढण्याची परंपरा त्यांनी अखंडपणे जपली आहे.
या वारीमुळे श्री संत केजाजी महाराजांच्या नावाचा जयघोष पंढरपुरच्या विठ्ठल नगरीतही घुमत असुन, विदर्भातील संत परंपरेचा गौरव अधिक व्यापक होत आहे.
ह.भ.प. हरिदास महाराज महाकाळकर यांनी सांगितले की, तीन वर्षांपुर्वी शेगाव दुमाला, पंढरपुर येथे श्री संत केजाजी महाराजांच्या नावाने जागा खरेदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी टिनपत्रे शेड उभारले असुन संत केजाजी महाराज पालखी दिंडी मुक्कामी आहे.या ठिकाणी लवकरच श्री संत केजाजी महाराज मठ उभारण्यात येणार असुन महाराष्ट्रातुन येणाऱ्या श्री संत केजाजी महाराजांच्या भक्तांसाठी तेथे मोफत निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे पंढरपुरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असुन, श्री संत केजाजी महाराजांच्या कार्याचा आणि भक्ती परंपरेचा विस्तार राज्यभर होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.



