राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रत्येक आरतीत आणि अभंगात “वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा” असा उल्लेख आढळतो. मात्र प्रत्यक्ष पंढरपुरमध्ये रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजुला नसुन स्वतंत्रपणे उभारलेले आहे. या वेगळेपणामागे पौराणिक कथा, इतिहास आणि वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यपुर्ण आध्यात्मिक परंपरा दडलेली आहे.
स्वाभिमानाचा रुसवा आणि दिंडीरवनातील तपश्चर्या
द्वारकेची पट्टराणी रुक्मिणी एका प्रसंगी श्रीकृष्णाने राधेला दिलेला मान पाहुन स्वाभिमानामुळे नाराज झाली. कोणालाही न सांगता त्या द्वारका सोडुन दक्षिणेकडे निघाल्या आणि तत्कालीन दिंडीरवन म्हणजेच आजच्या पंढरपुरात येऊन एका चिंचेच्या झाडाखाली तपश्चर्येला बसल्या.
रुक्मिणीचा शोध घेत श्रीकृष्ण पंढरपुरात आले. तेथे त्यांना परमभक्त पुंडलिकाची आठवण झाली. पुंडलिकाने दिलेल्या विटेवर उभे राहुन श्रीकृष्ण भक्ताच्या सेवाभावाने प्रसन्न झाले आणि विठ्ठलरूपात तेथेच स्थिरावले. रुक्मिणी मात्र आपल्या तपश्चर्येच्या स्थानी राहिली. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरे स्वतंत्र झाली, अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे.
इतिहास आणि वास्तुरचना
इतिहासकारांच्या मते, विठ्ठल मंदिराचा उगम ११ ते १२ व्या शतकातील चालुक्य-होयसळ काळाशी जोडला जातो. रुक्मिणी मंदिराची उभारणी त्यानंतरच्या १३ ते १४ व्या शतकात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
रुक्मिणी मंदिर आकाराने लहान असले तरी अत्यंत देखणे आहे. गर्भगृहाबाहेरील प्रसिद्ध चौखांबी मंडपावरील कोरीवकाम, गजांतलक्ष्मीची प्रतिमा आणि विविध पौराणिक प्रसंग वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जातात.
याच परिसरात सत्यभामा आणि राही (राधा) यांची स्वतंत्र मंदिरे असुन कृष्णपरंपरेतील स्त्री-देवतांना दिलेले मानाचे स्थान अधोरेखित होते.
मुर्तीचे वैशिष्ट्य
रुक्मिणी मातेची काळ्या पाषाणातील मुर्ती सात्त्विक, प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव प्रकट करणारी आहे. डाव्या हातात कमळ असुन उजवा हात वरद किंवा कट्यवलंबित मुद्रेत आहे. नित्यपुजेत तसेच आषाढी, कार्तिकी एकादशी आणि नवरात्रासारख्या उत्सवांत देवीला पैठणी, रेशमी वस्त्रे, सोन्याचा मुकुट, नथ, तन्मणी, चिंचपेटी आणि विविध दागिन्यांनी अलंकृत केले जाते.
वारकरी संप्रदायातील ‘माऊली’
वारकरी संप्रदायात रुक्मिणीला केवळ विठ्ठलाची अर्धांगिनी म्हणुन नव्हे, तर जगन्माता म्हणुन मानले जाते.
“विठोबा माऊली तुझी माऊली जगाची… तशीच रखुमाई माऊली अनाथ-नाथांची…”
आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो भाविक प्रथम विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर रुक्मिणी मातेच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतात. वारकरी परंपरेनुसार रखुमाईच्या दर्शनाशिवाय पंढरीची वारी पुर्ण होत नाही.
महिला भाविकांसाठी रुक्मिणीचे मंदिर विशेष श्रद्धेचे स्थान आहे. देवीला हळद-कुंकु अर्पण करून चरणातील कुंकु कपाळी लावणे हे त्या आपल्या सौभाग्याचे प्रतीक मानतात.
भक्तीतील स्त्रीशक्तीचे तेज
विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरे भौतिकदृष्ट्या स्वतंत्र असली तरी भक्तांच्या हृदयात ती सदैव एकरूप आहेत. प्रत्येक वारकरीच्या मुखातुन उमटणारा जयघोष एकच असतो—”विठ्ठल रखुमाई!”
विठ्ठल हा भक्तीतील सेवा, कर्तव्य आणि कर्मयोगाचे प्रतीक आहे; तर रखुमाई ही स्वाभिमान, करुणा, मातृत्व आणि निस्सीम भक्तीची साक्षात मुर्ती आहे.
पंढरपूरातील रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर हे केवळ स्थापत्य नव्हे, तर स्त्रीच्या स्वाभिमानाचे, भक्तीतील समतेचे आणि मायेच्या अखंड शक्तीचे प्रतीक आहे. म्हणुनच विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदायाचे हृदय मानले जाते, तर रखुमाईचे मंदिर त्या भक्तीवर पसरलेली करुणामयी मायेची सावली आहे.


