‘जातो माघारी पांडुरंगा…’ म्हणत परतीच्या वाटेवर प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यांत वाहते विरहाची चंद्रभागा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
आषाढी वारीचा महासोहळा संपतो आणि लाखो वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. मात्र ही केवळ घराकडे परतण्याची वाट नसते; ती विठ्ठलापासून दूर जाण्याच्या विरहाची वेदनादायी यात्रा असते. पंढरीच्या वेशीबाहेर पडताना प्रत्येकाच्या ओठांवर एकच आर्त स्वर उमटतो “आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा”
“जातो माघारी पांडुरंगा… डोळ्यातुन वाहे चंद्रभागा” आणि डोळ्यांतून वाहु लागते चंद्रभागाच.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करणारा वारकरी परतीच्या वाटेवर मात्र जड अंतःकरणाने चालत असतो. देह गावाकडे निघतो, पण मन विठ्ठलाच्या चरणीच गहाण राहते. वारीत भेटलेले अनोळखी जीव आपलेसे होतात आणि निरोपाच्या वेळी एकमेकांच्या गळ्यात पडुन पुढच्या वारीत पुन्हा भेटण्याचा शब्द देतात.
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसुन समता, प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचा जिवंत उत्सव आहे. शंभर वर्षांचा वृद्ध, अपंग भक्त, लहान मुलं, शेतकरी, कामगार, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष—सर्वजण एका नामात, एका भक्तीत आणि एका विठ्ठलात एकरूप होतात. म्हणुनच पंढरी सोडताना प्रत्येकाच्या डोळ्यांत विरहाचे अश्रु दाटतात.
पंढरपुर रिकामे होत जाते, पण वारकऱ्यांच्या हृदयात विठ्ठल कायमचा वसतो. संसाराच्या व्यापात परतताना तो भक्तीची, समतेची आणि प्रेमाची अमुल्य शिदोरी सोबत घेऊन जातो. वर्षभर हीच शिदोरी त्याला जगण्याचे बळ देते आणि पुढील आषाढीची ओढ मनात जिवंत ठेवते.
म्हणूनच परतीच्या वाटेवर प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणातुन एकच साद उमटते—”विठ्ठला, शरीर प्रपंचाकडे निघालंय; पण माझा जीव तुझ्याच चरणी ठेवून चाललोय. पुढच्या आषाढीला पुन्हा बोलावुन घे.
“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!

