एकाच वर्गात शिकलेल्या दोन मित्रांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु; गावात हळहळ
घोराड, प्रतिनिधी :
घोराड गावातील दोन उमदे तरुण अल्पावधीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दगावल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, दोघेही जिवलग मित्र असुन त्यांनी एकाच वर्गात शिक्षण घेतले होते. तसेच विद्यार्थी शारदा मंडळाचे सक्रिय सदस्य होते. सलग झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे ओबीसी सेलचे विधानसभा अध्यक्ष तथा घोराड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश खोपडे (वय ४२) यांचे २२ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व चार वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे.
त्यानंतर आज दि.३१ला त्यांचेच वर्गमित्र आशीष माहुरे (वय ४२) यांचेही सेवाग्राम रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दहा वर्षांचा मुलगा आणि लहान चिमुकली मुलगी असा परिवार आहे.
एकाच वयाचे, एकाच वर्गात शिक्षण घेतलेले आणि जिवलग मित्र असलेल्या या दोघांच्या अकाली निधनामुळे घोराड गावात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभुमीवर सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असुन सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. दोन उमद्या तरुणांच्या अकाली जाण्याने गावाने आपले दोन कर्तबगार चेहरे गमावल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

