पडताळणी पुर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध; उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई :
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील ५.५ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असुन, इतर जिल्ह्यांतील याद्याही पडताळणी पुर्ण होताच टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित बँका, सहकारी संस्था आणि स्थानिक कार्यालयांकडे उपलब्ध करून दिली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC/बायोमेट्रिक) आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभाची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, पात्रतेची पडताळणी सुरू असल्याने उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या पुढील टप्प्यांत जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाव पहिल्या यादीत नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संबंधित बँक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

