खरांगणा बसस्थानकाजवळील धाडसी चोरी; श्वानपथक, ठसेतज्ज्ञांकडुन तपास सुरू
गणेश खंते | प्रतिनिधी, खरांगणा
खरांगणा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री गॅस कटरने शटर कापुन धाडसी चोरी करत तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असुन ग्रामीण भागातील एटीएम सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन फोडुन त्यामधील १२ लाख २२ हजार रुपयांची रोकड काढुन पोबारा केला. सकाळी एटीएमची तोडफोड झाल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच वरिष्ठांना माहिती दिली, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे इथे सुरक्षा रक्षक हजर राहत नसल्याने धाडसी चोरी झाल्याचे सांगण्यात येते.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असुन आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या धाडसी चोरीमुळे ग्रामीण भागातील एटीएमच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असुन रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडुन पुढील तपास सुरू आहे.


