सोयाबीन, कापुस, तुर पिकांना जीवदान; शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित
राजेश वरटकर
वर्धा
गेल्या काही दिवसांपासुन होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन, कापुस आणि तुर पिकांनी नवसंजीवनी दिली आहे. अनेक शेतांमध्ये पिकांची वाढ जोमाने सुरू झाली असून हिरवागार शिवार पाहुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसु लागले आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पेरणीनंतर पाऊस खंडित झाल्याने पिके सुकण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, अलीकडील पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असुन पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. काही भागांत तणांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी तणनाशक फवारणी व आंतरमशागत करण्यासाठी शेतात उतरले आहेत.
कृषी तज्ज्ञांनी सध्या अनावश्यक रासायनिक खतांचा अतिरेक टाळण्याचा आणि पिकांची नियमित पाहणी करण्याचा सल्ला दिला आहे. रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
आता नजरा उत्पादनाकडे लागल्या असुन सध्या पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी पुढील काही आठवडे नियमित पाऊस आणि योग्य व्यवस्थापन मिळाल्यास यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

