शिवशाही न्युज नेटवर्क
चंद्रपुर जिल्ह्यातील भिसीजवळ मुक्ताई धबधब्याकडे जात असताना झालेल्या भीषण अपघातात नागपुरच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यु झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात व्हॅगनॉर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारे मैथली संतोष सावंत (१९), मोहित दिनेश घटारे (१९), ध्वनी गजानन कामळे (२०), खुशी हरीदास इंगळे (१९), रिया राजु देवागीरकर (२१) आणि ट्विंकल किशोर चिकाटे (२१) हे सहा मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी दोन दुचाकींवरून चिमुर तालुक्यातील मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी सुमारे ११.३० वाजता चिमुर मार्गावरील टाका फाट्याजवळ पाणी पिण्यासाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या.
याचवेळी मागुन भरधाव वेगाने आलेल्या ग्रे रंगाच्या व्हॅगनॉर कारने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिया राजु देवागीरकर (२१) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मैथली संतोष सावंत (१९) हिला पाय, कोपर आणि डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेनंतर सहकारी विद्यार्थ्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. जखमींना नागपुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारी सुमारे ४ वाजता डॉक्टरांनी रिया देवागीरकर हिला मृत घोषित केले. गंभीर जखमी मैथली सावंत हिला पुढील उपचारासाठी धंतोली येथील शंकरा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी जखमी मैथली सावंत यांच्या मावशी स्नेहलता वनमाली सामल (३८, रा. नागपूर) यांच्या तक्रारीवरून भिसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्हॅगनॉर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी मंगेश भोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालकृष्ण जिभकाटे पुढील तपास करीत असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

