हिंगणीतील इप्का कंपनीविरोधात साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांचा गंभीर आरोप;
एमडी, विभागप्रमुख व कंत्राटदारांवर कामगारांच्या आर्थिक शोषणाचा ठपका
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु तालुक्यातील हिंगणी येथील इप्का कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी केला आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनायक फडणीस, हार्टिकल्चर विभाग प्रमुख अलका आणि संबंधित कंत्राटदार यांच्या संगनमताने गेल्या चार वर्षांत कामगारांच्या हक्काच्या सुमारे ६ कोटी ३० लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रविन्द्र कोटंबकार यांनी केलेल्या आरोपानुसार, कामगारांकडुन ६८५ रुपये प्रतिदिन दराने सही घेतली जाते, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या हातात फक्त ३५० रुपये दिले जातात. तसेच महिन्याचे ३० दिवसांचे वेतन नोंदवुन केवळ २६ दिवसांचे पैसे देण्यात येतात. कायद्यानुसार मिळणाऱ्या चार पगारी सुट्ट्यांचाही मोबदला कामगारांना मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
कंपनीत सुमारे ७०० ते ८०० कंत्राटी कामगार कार्यरत असुन, प्रत्येक कामगाराच्या वेतनातुन दर महिन्याला मोठी रक्कम वळती केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे चार वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संपुर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रविन्द्र कोटंबकार यांनी केली आहे.

