बैलजोडी हाकत मशागतीत महिलांचा आदर्श; पळसगावच्या चंदा हुडे यांची प्रेरणादायी कहाणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
‘शेती हीच खरी जीवनरेखा’
हे केवळ बोलुन न दाखवता प्रत्यक्ष कृतीतुन सिद्ध करणाऱ्या देवळी तालुक्यातील पळसगाव येथील सौ. चंदा राजु हुडे यांनी आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावत शेती मशागतीत सहभाग घेतला आहे. बैलजोडी हाकत पारंपरिक पद्धतीने मशागत करताना त्यांचे श्रम, जिद्द आणि कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
अलीकडील काळात शेतीमध्ये मजुरांची टंचाई, वाढता खर्च आणि बदलते हवामान यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत चंदा हुडे यांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता पतीसोबत शेतात उतरून मशागतीची जबाबदारी उचलली. त्यांच्या या कष्टाळु वृत्तीमुळे महिलाही शेतीच्या प्रत्येक कामात सक्षमपणे योगदान देऊ शकतात, हे त्यांनी दाखवुन दिले आहे.
कुटुंबाच्या शेतीला आधार देताना त्या केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर शेतातील प्रत्येक कामातही पुढाकार घेतात. त्यांच्या या कार्याचे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत असुन, ग्रामीण महिलांसाठी त्या प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

