आज श्राद्ध, शुक्रवारी काला-दहीहंडी व महाप्रसाद
अनुज वरटकर
घोराड (प्रतिनिधी):
विदर्भातील दुसरे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराज यांचे सुपुत्र श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
श्री संत केजाजी महाराज व श्री संत नामदेव महाराज हे दोन्ही संत एकाच परिवारात व एकाच गावात होऊन गेल्याने श्री क्षेत्र घोराडला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या संतांच्या कृपा-आशीर्वादाने अनेक भाविकांच्या अडचणी दूर झाल्याची श्रद्धा असुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य भक्त आहेत.
आज (गुरुवारी) दुपारी १२ वाजता समाधीपुजन, त्यानंतर भजन आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी १२ वाजता काल्याचे कीर्तन, दुपारी ३ वाजता काला वाटप, सायंकाळी ४ वाजता गंगामाई मंदिर परिसरात दहीहंडी उत्सव, तर सायंकाळी ५ वाजल्यापासून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन संतांच्या पुण्यस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

