करुणाश्रमात उपचारासाठी हलविले; वनकर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक
गणेश खंते
प्रतिनिधी
खरांगणा (मो.) : मुक्या जीवावर आलेले संकट ओळखत वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे विजेचा धक्का बसुन गंभीर जखमी झालेल्या माकडाला नवजीवनाची आशा मिळाली आहे. वेळेवर सुटका, प्राथमिक उपचार आणि पुढील उपचारासाठी करुणाश्रमात दाखल करण्यापर्यंतची संपुर्ण जबाबदारी वनकर्मचाऱ्यांनी पार पाडत माणुसकीचा आदर्श घालुन दिला.
खरांगणा येथील माकडांच्या कळपातील एका माकडाला विजेचा धक्का बसुन ते विद्युत खांबावर गंभीर अवस्थेत अडकले होते. घटनेची माहिती मिळताच बीट रक्षक ए. पी. राठोड तसेच वनरक्षक उपाध्याय, घुगे आणि गोदमल्ले यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविवारी धाडसाने त्याची सुखरूप सुटका केली.
त्यानंतर हिंगणी बीटाच्या वन्यप्राणी कक्षात दोन ते तीन दिवस त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्या माकडाला वर्धा येथील पीपल फॉर ॲनिमल्सच्या हनुमान टेकडीवरील करुणाश्रमात हलविण्यात आले.
करुणाश्रमाचे प्रमुख श्री.आशीष गोस्वामी यांनी माकडावर आवश्यक उपचार करून सुमारे दहा दिवसांत ते पुर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा जंगलात मुक्त केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुक्या प्राण्याच्या जीवासाठी वनविभागाने दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता परिसरात चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांकडुन वनकर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

