भंडारा बंद ला उस्फुर्त प्रतिसाद
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी
विशेष प्रतिनिधी
भंडारा
भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला अटक केली असून, आरोपी मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यापुर्वीही त्याने अशाच प्रकारचे कृत्य केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी भंडारा शहरासह जिल्हाभरात उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. विद्यार्थी, महिला, सामाजिक संघटना, व्यापारी आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
निषेध मोर्चादरम्यान “आरोपीला फाशी द्या”, “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “महिलांवरील अत्याचार थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला. विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन न्यायासाठी आवाज बुलंद केला, तर अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवुन आंदोलनाला पाठिंबा दिला.
घटना उघडकीस आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी संतप्त नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यावर धडक देत आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सध्या शहरात शांतता असली तरी वातावरणात संताप आणि तणाव कायम आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करून दोषीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. तसेच महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहनही आंदोलनकर्त्यांनी केले.दरम्यान भंडारा पोलीस पुढील तपास करीत आहे.
