वर्धेच्या रितेश गोपाल खांदारे यांची मुर्तिकलेत वेगळी ओळख;
गणेशोत्सवासाठी आकर्षक मुर्तींना मागणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आपल्या कलेच्या जोरावर व्यवसाय उभा करणारे वर्धा येथील मुर्तिकार रितेश(मोन्टी)गोपाल खांदारे ( सिंदी मेघे, वर्धा) यांनी मुर्तिकलेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कलेची साथ सोडायची नाही, या जिद्दीने त्यांनी मुर्तिनिर्मितीचा व्यवसाय उभा केला असुन त्यांच्या हातुन साकारलेल्या आकर्षक मुर्तींना गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर चांगली मागणी मिळत आहे.
कलेला व्यवसायाची जोड
मुर्तिकला ही केवळ परंपरा नसुन त्यातुन रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा मार्गही निर्माण होऊ शकतो, हे रितेश खांदारे यांनी दाखवुन दिले आहे. माती, पीओपी, रंग आणि विविध साहित्याचा वापर करून ते मनमोहक मुर्ती साकारतात. मुर्तीचा सुबक आकार, चेहऱ्यावरील भाव, आकर्षक रंगसंगती आणि कलाकुसर यावर विशेष भर दिला जातो.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मुर्तींना विशेष मागणी असते. ग्राहकांच्या आवडीनुसार विविध आकार व स्वरूपातील मुर्ती तयार करण्याचे काम ते करतात.
मेहनत, कौशल्य अन् जिद्दीची कमाई
मुर्तिनिर्मितीच्या व्यवसायात कच्चा माल, रंग, वाहतुक आणि मजुरीच्या खर्चात सातत्याने वाढ होत असतानाही गुणवत्तेशी तडजोड न करता मुर्ती तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दिवस-रात्र मेहनत घेत कलेला व्यवसायाची जोड देत त्यांनी हा उद्योग उभा केला आहे.
“मुर्तिकला ही माझ्यासाठी केवळ व्यवसाय नसुन माझी कला आणि ओळख आहे. ग्राहकांच्या पसंतीला उतरतील अशा दर्जेदार आणि आकर्षक मुर्ती तयार करण्याचा कायम प्रयत्न असतो,” अशी भावना मुर्तिकार रितेश गोपाल खांदारे यांनी व्यक्त केली.
तरुणांसाठी प्रेरणादायी वाटचाल मुळचे सेलु येथील व सध्या वर्धा येथे सिंदी मेघे परिसरात चैतन्य नगर येथे परिवारासोबत वास्तव्यास असलेले रितेश गोपाल खांदारे
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फाईन आर्ट या शिक्षणाच्या माध्यमातुन नौकरी करावी अशी ईच्छा असतांनाच वडीलांना मदत म्हणुन या पारंपारिक व्यवसायात आवड निर्माण झाली व लहानपणी पासुनच मुर्ती कला आत्मसात केली आणि आज नौकरी च्या मागे न लागता कलेतुन व्यवसाय उभा राहिला.
नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवुन व्यवसाय उभा करणारे रितेश गोपाल खांदारे यांची वाटचाल तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कष्ट, कौशल्य आणि जिद्द यांच्या जोरावर पारंपरिक कलेतुनही आत्मनिर्भर होता येते, हे त्यांनी आपल्या कामातुन सिद्ध केले आहे.

