विषारी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली; पाच वर्षांची मुलगी, १५ महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून गेली आई
विशेष प्रतिनिधी | नागपुर
नागपुरजवळील चिकणा(पाचगाव )गावात घरगुती वादातुन शनिवार दि.८ ला एका विवाहित महिलेने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सौ. कोमल महेंद्र वाडीभस्मे ३० यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात सासु, सासरे, पती तसेच पाच वर्षांची मुलगी आणि अवघ्या १५ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती कारणावरून झालेल्या वादातुन कोमल यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद पाचगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर चिकणा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, आईच्या निधनाने पाच वर्षांची चिमुकली आणि १५ महिन्यांचा मुलगा आईच्या मायेपासुन कायमचे पोरके झाले आहेत. या घटनेमुळे चिकणा गावावर शोककळा पसरली असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास ठाणेदार मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगाव पोलिसांकडुन सुरू आहे.

