तेव्हाच कठोर शिक्षा झाली असती तर आज चिमुकलीवर अत्याचाराची वेळ आली असती का?
भंडाऱ्यात संतापाचा भडका; जुन्या प्रकरणाचा तपास करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा
चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराने संपुर्ण भंडारा हादरला असतानाच आरोपी रोहित संजय वासनिक (रा. गौतम बुद्ध वॉर्ड, भंडारा) याच्यावर यापुर्वीही पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट प्रशासनाला सवाल केला आहे आधीच गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आरोपीवर वेळीच प्रभावी कारवाई झाली असती, तर आज एका चिमुकलीवर अत्याचाराची वेळ आली असती का?
आंबेडकर वॉर्ड परिसरात गुरुवारी दि.६ दुपारी अंगणवाडी जवळील मुत्रीघरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. घटना उघडकीस आल्यानंतर भंडाऱ्यात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी वासनिक याला अटक केली. गुरुवारी सायंकाळी संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर धडक देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी दि .७ला भंडारा शहरासह जिल्हाभरात बंद पाळण्यात आला. हजारो नागरिक, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. ‘आरोपीला फाशी द्या’, ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी शहर दणाणुन गेले.
जुन्या पोस्को प्रकरणाचा हिशेब द्या!
आरोपीविरुद्ध यापुर्वी दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्या प्रकरणात तपास कुठपर्यंत झाला? न्यायालयीन प्रक्रिया काय झाली? आरोपीला शिक्षा झाली का? याची अधिकृत माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
‘पूर्वीच्या प्रकरणातच कायद्याचा धाक निर्माण करणारी योग्य कारवाई झाली असती, तर कदाचित आज एका चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली नसती,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधुन उमटत आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा!
सध्याच्या प्रकरणाचा तपास जलदगतीने पुर्ण करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
त्याचबरोबर आरोपीच्या पुर्वीच्या पोस्को प्रकरणातील तपास, कारवाई आणि न्यायालयीन स्थितीचीही सखोल चौकशी करावी. पुर्वीच्या कारवाईत कोणतीही दिरंगाई अथवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘पुन्हा चिमुकली बळी पडु नये!’
भंडाऱ्यातील नागरिकांचा संतप्त सवाल आता थेट प्रशासनाला आहे,गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर कायद्याचा धाक कधी निर्माण होणार? बालकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत आणि बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत जनआक्रोश कायम राहील, अशी भावना नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.

