८ वर्षीय देवांशचा जागीच मृत्यु; १२ वर्षीय रुद्रांश गंभीर जखमी
हल्ल्यानंतर आरोपी पिता फरार, दुर्गापुर पोलिसांनी तलाव परिसरातुन केली अटक
विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर शहरातील शक्तीनगर वेकोलि वसाहतीत घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपुर्ण परिसर हादरला आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन मुलांवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी घडली. या हल्ल्यात ८ वर्षीय देवांश मंगेश बदखल याचा जागीच मृत्यु झाला, तर त्याचा १२ वर्षीय भाऊ रुद्रांश गंभीर जखमी झाला आहे.
शक्तीनगर येथील एम-२९ क्वार्टरमध्ये ही घटना घडली. आरोपी मंगेश भारत बदखल (४९) हा ऑटो चालवुन मुलांचा सांभाळ करीत होता. कौटुंबिक वादातुन त्याचे पत्नीशी मतभेद निर्माण झाले होते. मागील वर्षभरापासुन पत्नीपासुन तो विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा भाऊ राहुल हा वेकोलित कार्यरत असून दोन्ही भाऊ आणि मुले एकाच क्वार्टरमध्ये राहत होते.
फोनवरील वादाचा राग मुलांवर?
१० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मंगेश घरी आला. यावेळी मुलांना सोबत नेण्याच्या मुद्द्यावर त्याचा पत्नीशी फोनवरून वाद झाल्याची माहिती आहे. या वादातुन निर्माण झालेल्या रागातुन त्याने दोन्ही मुलांवर ब्लेडने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात देवांश गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. तर रुद्रांश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तत्काळ दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. रुद्रांशवर सध्या उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर पित्याचा पलायनाचा प्रयत्न
घटनेनंतर आरोपी मंगेशने घटनास्थळावरून पलायन केले. दुर्गापुर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत त्याला तुकुम तलाव परिसरातुन अटक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन दुर्गापुर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, आरोपी मंगेश बदखल याच्याविरुद्ध २०२४ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले असुन आरोपीची पुर्वीची गुन्हेगारी पार्श्वभुमीही तपासाचा भाग ठरण्याची शक्यता आहे.
जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलावर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे शक्तीनगर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

