स्ट्रीट लाईट व नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला अल्टीमेटम; तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती सादर
२१ दिवसांपासुन न्याय मिळेना
उपोषणकर्ते धनराज लोखंडे यांची प्रकृती खालावली
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
बोरधरण परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि गेल्या ६ ते ८ महिन्यांपासुन रेंगाळलेला स्ट्रीट लाईटचा विषय आता चांगलाच पेटला आहे. या मुलभुत समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली असुन हिंगणी येथील बाजार चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
पाण्यासाठी भटकंती अन् ६ महिन्यांपासून स्ट्रीट लाईटचा प्रश्न प्रलंबित
बोरधरण येथील स्थानिक रहिवासी, विशेषतः सौ. शोभाबाई धनविज यांच्या घराच्या परिसरात व लगतच्या भागात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत बोरी ग्रामपंचायतीला वारंवार अवगत करूनही प्रशासनाकडुन कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
तसेच बोरधरण कॉलनीत अंधाराचे साम्राज्य दुर करण्यासाठी ६ ते ८ महिन्यांपुर्वी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊनही प्रशासनाने ‘स्ट्रीट लाईट’ सुरू करण्याबाबत टाळाटाळ चालवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उपोषणाला पाठिंबा अन् प्रशासनाला संयुक्त निवेदन
बाजार चौक हिंगणी येथे ‘राष्टीय मजदुर संघाचे’ जिल्हाध्यक्ष भास्करजी मुडे यांच्या नेतृत्वाखाली २१विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला बोरधरण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. धनराज दादाराव लोखंडे व सौ. शोभाबाई धनविज यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला व उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रसंगी प्रशासक, ग्रामसेवक ग्रामपंचायत बोरी यांना संयुक्त निवेदन देऊन बोरधरण कॉलनीतील बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्याची आणि पिण्याच्या नळाच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.मात्र २१दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनकर्ते धनराज लोखंडे यांची प्रकृती खालावली तरीही अधिकारी ढुंकुन पहायला आले नसल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रतिलिपी सादर
या समस्येचे गांभीर्य ओळखुन सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार (सेलु), गटविकास अधिकारी (पंचायत समिती, सेलु), ठाणेदार (पोलीस स्टेशन, सेलू) आणि आंदोलनकर्ते भास्कर मुडे यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीने या रास्त मागण्यांची तात्काळ पुर्तता न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याच मागणीसाठी वर्धा येथे खासदार अमर काळे यांनाही अवगत केले होते मात्र उपयोग झाला नाही, ग्रामसेवक आगावु यांच्या निदर्शनास आणुन दिले मात्र तेही उडवा उडवीचे उत्तर देत आहे.ग्रामपंचायतला या आधीही गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले,मात्र विज कर घेतला जातो, पण अंधारात राहावे लागते, सध्या पावसाळा सुरू असुन सरपटणारे प्राणी रस्त्यावर फिरत आहे,गरज नाही तिथे स्ट्रीट लाईट लावुन विकास केल्याचा कांगावा केला मात्र भोंडाई माता मंदिर कडे जाणारा रस्ता अंधारातच ठेवण्यात आला आहे.म्हणुन मी प्रकृती खालावली तरीही न्याय मिळे पर्यंत आंदोलन सोडणार नाही.
धनराज लोखंडे
बुद्ध उपासक, प्रचारक तथा सामाजिक कार्यकर्ते,बोरधरण

