वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची नागरिकांची मागणी!
सेलु (विशेष बातमीदार):
गावठी मोहादारूच्या अवैध साठवणुक व विक्रीविरोधात सेलु पोलिसांनी धडक कारवाई करत ३४० लिटर मोहादारूसह सुमारे ७१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि जप्ती प्रक्रियेवरच स्थानिक पातळीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धाड टाकुन १७ प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली ३४० लिटर गावठी मोहादारू (किंमत ₹६८,०००) आणि ३ हजार ४०० रुपये किमतीचे कॅन, असा एकूण ₹७१,४०० चा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात कारवाईचा संपुर्ण पाढा वाचला असला, तरी संबंधित आरोपीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचनामा अन् विल्हेवाटीत ‘झोल’?
या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या दारूची विल्हेवाट नेमकी कोणत्या पद्धतीने लावली गेली? पंचनाम्यापासून ते मुद्देमाल नष्ट करेपर्यंतची प्रक्रिया नियमानुसार पार पडली का? याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षांपुर्वी याच पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेली दारू परस्पर विल्हेवाट लावल्याची प्रकरणे चर्चेत आली होती. त्यामुळे या कारवाईतही तफावत आहे का, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ठाणेदारांच्या आश्वासनाला विभागातीलच ‘शुक्राचार्यां’चा सुरुंग!
अनेक वर्षांपासुन एकाच पोलीस ठाण्यात पाय रोवुन बसलेले काही कर्मचारी आणि अवैध दारू विक्रेते यांच्यात ‘सलोख्याचे संबंध’ असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळेच हप्त्यापोटी या माफियांवर थेट कारवाई केली जात नाही. आणि वरिष्ठांच्या आदेशावरून नाईलाजाने कारवाई करावीच लागली, तर “दारू विकणाऱ्याचे नाव समोर येणार नाही” याची पुरेपुर काळजी पोलिसांकडुनच घेतली जात असल्याचा घणाघाती आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सेलु पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी “तालुक्यातील अवैध दारू विक्री अजिबात सहन केली जाणार नाही व दारूबंदीसाठी कोणतीही कसर सोडणार नाही” असा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, ठाणेदारांच्या या मोहिमेला त्यांच्याच विभागातील काही ‘शुक्राचार्य’ कर्मचाऱ्यांकडुन सुरुंग लावला जात असल्याने, आता वरिष्ठ पोलीस अधीक्षक याप्रकरणी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

