पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापुस आणि तुरीच्या पिकांवर संकट; दमदार सरींची प्रतीक्षा
विशेष प्रतिनिधी | सेलु
तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापुस आणि तुरीच्या पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असुन, पिकांना सध्या संजीवनी ठरणाऱ्या दमदार पावसाची नितांत गरज आहे.
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे. सोयाबीनच्या पिकाला सध्या पाण्याची मोठी गरज असुन, पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे.
आभाळाकडे डोळे; शेतकऱ्यांची चिंता वाढली
आकाशात ढगांची गर्दी दिसत असली तरी अपेक्षित पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील पावसामुळे पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला होता; मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावुन बसले आहेत.
पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
सोयाबीन, कापुस आणि तुर ही प्रमुख पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काही दिवसांत दमदार पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सोमवार नागपंचमी असुन नक्षत्र बदलणार आहे,मोरावर येणाऱ्या नक्षत्रावर शेतकरी वर्गाची भिस्त आहे.
पावसाळ्याच्या हंगामात वरुणराजाची कृपादृष्टी राहावी आणि पिकांना आवश्यक पाणी मिळावे, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे. आता मेघांची हुलकावणी संपुन पावसाच्या जोरदार सरी कधी बरसणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

