नागरिकांनी लेखी निवेदनासह उपस्थित राहावे.
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा.
महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा जनसंवाद कार्यक्रम होणार असून, यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणुन घेण्यात येणार आहेत.
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना महसुल विभागाशी संबंधित तसेच इतर शासकीय कामकाजासंदर्भातील समस्या, अडचणी आणि मागण्या थेट महसुल मंत्र्यांसमोर मांडता येणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या समस्या अथवा मागण्यांबाबत निवेदन सादर करायचे आहे, त्यांनी आपल्या विषयाची लेखी स्वरूपातील निवेदने आवश्यक कागदपत्रांसह सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी नागरिकांनी निवेदनामध्ये विषयाची स्पष्ट माहिती देऊन उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांनी केवळ आपल्या समस्या व निवेदने घेऊन उपस्थित राहावे. मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी हार, पुष्पगुच्छ किंवा इतर कोणतेही सत्काराचे साहित्य आणु नये, अशी विनंती स्विय सहायक विपीन पिसे कडुन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

