१२ तास अभ्यास अन् पार्टटाईम नोकरी;
UPSC-CAPF मध्ये All India Rank मिळवत हेमंत बुजाडेंनी गाठले यशोशिखर
अजय गांजरे
वरोरा तालुका प्रतिनिधी
मारेगाव (रोड)च्या चंद्रमौळी झोपडीतुन सुरू झालेला प्रवास थेट केंद्र सरकारच्या ‘ग्रुप ए’ राजपत्रित अधिकारी पदापर्यंत! परिस्थितीने कितीही परीक्षा घेतली तरी जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची कास सोडली नाही, तर यशाला गवसणी घालता येते, हे हेमंत लता शंकर बुजाडे यांनी आपल्या कर्तृत्वातुन सिद्ध करून दाखविले आहे.
अठराविश्व दारिद्र्याची परिस्थिती, अपुऱ्या सुविधा आणि उदरनिर्वाहासाठी पार्टटाईम नोकरी अशी आव्हानांची मालिका समोर असतानाही हेमंत बुजाडे यांनी तब्बल १२ तास अभ्यास केला. दिवसभर कष्ट आणि त्यानंतर अभ्यासाची जिद्द कायम ठेवत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
अखेर या संघर्षाला यशाची किनार लाभली. UPSCमार्फत घेण्यात येणारी CAPF (Central Armed Police Forces) परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी All India Rank मिळविला. या यशामुळे त्यांची Assistant Commandant या केंद्र सरकारच्या ग्रुप ‘A’ राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे.
गरिबीसमोर झुकले नाहीत; ध्येयासमोर परिस्थिती झुकवली!
हेमंत बुजाडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहेत. उच्च शिक्षणाच्या माध्यमातुन प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. आर्थिक अडचणींनी अनेकदा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी हार मानली नाही.
शिक्षण, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी परिस्थितीवर मात केली. त्यामुळे त्यांचे यश हे केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नसून वंचित आणि संघर्षमय परिस्थितीतुन पुढे येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहे.
बाबासाहेबांच्या विचारांना कर्तृत्वाची सलामी
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारातून प्रेरणा घेत हेमंत बुजाडे यांनी शिक्षणाला आपल्या जीवनातील परिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले. प्रशासनात उच्च पदावर पोहोचुन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आता साकार झाले आहे.
त्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सर्वधर्मीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चंद्रमौळी झोपडीपासुन ‘क्लास वन’ अधिकारी पदापर्यंतचा हा प्रवास सांगतोय—
परिस्थिती गरीब असली तरी स्वप्ने मात्र श्रीमंत असली पाहिजेत!

