भीषण अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यु
हंसा ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली आल्याने १६-१७ वर्षीय विद्यार्थिनींचा दुर्दैवी अंत
विशेष प्रतिनिधी
हिंगणघाट : स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात देशभक्तीचा जल्लोष सुरू असतानाच सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. सकाळी बिडकर कॉलेज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजदरम्यान हंसा ट्रॅव्हल्स आणि ॲक्टिव्हा दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ॲक्टिव्हावरून प्रवास करणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यु झाला.
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही विद्यार्थिनी हंसा ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली आल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. मृत विद्यार्थिनींमध्ये आरुषी राजु चाऊरे (वय १६, रा. सिपर कॉलनी, हिंगणघाट), मिसबा जाविद शेख (वय १७, रा. टाका मशीद परिसर, हिंगणघाट) आणि समृद्धी धामे (वय १७) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. तिन्ही विद्यार्थिनी इयत्ता ११वीत शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातातं ॲक्टिव्हा आणि ट्रॅव्हल्सची धडक कशी झाली, याचा तपास पोलिसांकडुन सुरू आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचा उत्साह असतानाच तीन चिमुकल्या विद्यार्थिनींच्या मृत्युची बातमी समोर आल्याने हिंगणघाटकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या १६-१७ वर्षांच्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे संपुर्ण हिंगणघाट शहर शोकसागरात बुडाले असुन, अपघातातील मृतांची व घटनेची अधिकृत माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

