आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला वाचविले; सेलुचे पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडुन गौरव
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : आत्महत्येच्या विचाराने विहिरीत उडी मारलेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांच्या सतर्कतेमुळे अक्षरशः मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढण्यात यश आले. अवघ्या काही वेळात मोबाईल लोकेशनच्या आधारे विद्यार्थ्याचा शोध घेत त्याचे प्राण वाचविणाऱ्या सेलु पोलिसांच्या कामगिरीची वर्धा जिल्हा पोलिस प्रशासनाने दखल घेतली आहे.
४ ऑगस्ट रोजी उमरखेड, जि. यवतमाळ येथील विद्यार्थी ओंकार प्रकाश लाहोरे हा मोटारसायकलने वर्धेकडे निघाला होता. त्याने फोनवरून आत्महत्या करण्याबाबत सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गजानन वाघोडे यांनी क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थ्याच्या मोबाईलचे लोकेशन मिळवुन शोधमोहीम सुरू केली.
शोध घेत असताना विद्यार्थी कोटंबा फाटा परिसरातील शेतातील विहिरीत उडी मारल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने विद्यार्थ्याला विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात आले. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून पुढील धोका टाळण्यात आला.
सतर्क पोलिसांनी वाचविले एक अनमोल आयुष्य!
या धाडसी, संवेदनशील आणि तत्पर कार्याची दखल घेत वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.
मोबाईल लोकेशनचा अचुक वापर, पोलिसांची तत्परता आणि योग्य वेळी केलेली मदत… यामुळे एका विद्यार्थ्याला नवजीवन मिळाले. सेलछ पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
