मुंबई | प्रतिनिधी
मुंबईच्या मुलुंड परिसरात कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिला निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, प्रसंगावधान राखत तरुणीने तत्काळ आपल्या आईला फोन केल्याने आरोपीचा डाव फसला. आईने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केल्याने आरोपी पळुन गेला. दरम्यान, मुलुंड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली नगर परिसरात ही घटना घडली. तरुणी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. कमी वर्दळीच्या आणि झाडी-झुडपांनी व्यापलेल्या परिसरात संधी साधुन त्याने तरुणीला ओढत नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगात घाबरून न जाता तरुणीने धाडस दाखवत आईला फोन केला. मुलीचा फोन आल्यानंतर आईने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आईने आरडाओरड सुरू करताच आरोपीने तेथुन पळ काढला.
घटनेनंतर तरुणीच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तब्बल सहा तपास पथके तयार केली. घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि अनिल करोटिया याला अटक केली. आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या घटनेने मुलुंड परिसरात खळबळ उडाली असुन, पहाटेच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरुणीने दाखवलेले प्रसंगावधान आणि पोलिसांनी अवघ्या सहा तासांत केलेली कारवाई यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले.

