१६ ऑगस्टपासुन वाहतुक पोलिसांची विशेष मोहीम; पालकांनो, मुलांच्या हाती वाहन देताना सावधान!
वर्धा | जिल्हा प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेने आता कडक पाऊल उचलले आहे. १८ वर्षांखालील मुलांच्या हातात दुचाकी अथवा चारचाकी वाहन देणाऱ्या पालकांसह वाहनमालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत अल्पवयीन वाहनचालकांकडुन वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढत असल्याने १६ ऑगस्ट २०२६ पासुन विशेष वाहतुक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेने दिली आहे. या मोहिमेदरम्यान अल्पवयीन चालक तसेच विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
*वाहन दिले तर पालकही अडचणीत*!
१८ वर्षे पुर्ण होण्यापुर्वी वाहन चालविण्यास कायदेशीर परवानगी नसताना मुलांच्या हाती वाहन देणे पालकांसाठीही महागात पडु शकते. प्रसिद्धीपत्रकानुसार, अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास वाहनचालक व वाहनमालकावर कारवाई तसेच दंडाची तरतुद आहे. त्यामुळे ‘मुलाला थोडे अंतरच जायचे आहे’ असा विचार करून वाहन देणे पालकांना अडचणीत आणु शकते.
अपघात टाळण्यासाठी पालकांनी जबाबदारी घ्यावी
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे म्हणजे केवळ वाहतुक नियमांचे उल्लंघन नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या जीवितासह रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हाती वाहन देऊ नये, असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
“मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी वाहनाच्या चाव्या त्यांच्या हाती देऊ नका!” असा स्पष्ट संदेश वाहतूक पोलिसांनी दिला असून, विशेष मोहिमेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

