चंद्रपुर-मुल मार्गावर वलनी फाट्याजवळ ट्रक-स्विफ्टची भीषण धडक; विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यु
सचिन मेश्राम
विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपूर-मुल मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचारी विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यु झाला. वलनी फाट्याजवळ सकाळी सुमारे ६.३० वाजता ट्रक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेने मुल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा बन्सोड या स्वतःच्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच३४ बीआर २५६८ मधून चंद्रपुर येथे उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी जात होत्या. वलनी फाट्याजवळ त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यु झाला.
विशाखा बन्सोड यांची यापुर्वी सावली पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. नुकतीच त्यांची तळोधी (बाळापुर) येथे बदली झाली होती. प्रशिक्षणासाठी चंद्रपूरकडे जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
विशाखा बन्सोड या मुल शहरातील तेली मोहल्ला परिसरात रविकांत चिंतावार यांच्या घरी पतीसोबत भाड्याने राहत होत्या. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी परिसरात पोहोचताच नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विशाखा बन्सोड या मनमिळाऊ, हसतमुख आणि सहकार्याची भावना असलेल्या पोलीस कर्मचारी म्हणुन परिचित होत्या. नागरिकांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन, या भीषण अपघातामागील कारणाचा पोलीस तपास सुरू आहे.

