मेंढला गावातील धक्कादायक घटना; पती ५० टक्के भाजला, यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार
शिवशाही न्युज नेटवर्क
यवतमाळ
कळंब (यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच दुसऱ्या लग्नात पत्नी अडसर ठरत असल्याच्या रागातुन पतीने पत्नीला जिवंत पेटवुन दिल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील मेंढला येथे घडली. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या पत्नीचा चार दिवसांच्या उपचारानंतर मृत्यु झाला. दरम्यान, पत्नीला पेटवताना पतीदेखील सुमारे ५० टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती जुबेर बदर हसन सिद्दीकी (वय ४०, रा. मेंढला) याला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. तसेच पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याचबरोबर आपल्याला दुसरे लग्न करायचे असुन पत्नी त्यात अडसर ठरत असल्याचे त्याच्या मनात होते. या कारणावरून तो पत्नीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अखेर संतापाच्या भरात त्याने पत्नीला पेटवुन दिल्याची घटना घडली. या घटनेत पत्नी गंभीररीत्या भाजली. तिला तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. सलग चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी (१८ ऑगस्ट) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
चार दिवसांची झुंज अपयशी
घटनेनंतर दोघांनाही यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर अवस्थेतील पत्नीवर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यु झाला. दुसरीकडे पती जुबेर सिद्दीकी हा स्वतः सुमारे ५० टक्के भाजला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावात शोककळा; पोलिसांत गुन्हा दाखल
पत्नीच्या मृत्युची बातमी समोर येताच मंडळा गावात शोककळा पसरली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती जुबेर सिद्दीकी याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

