रमणा फाट्यावरील भारतीय ढाब्यासमोरील घटना
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु तालुक्यातील रमणा फाटा येथील भारतीय ढाब्यासमोर शनिवारी दुपारी भरधाव ट्रॅव्हलर आणि टिप्परची भीषण धडक झाली.
या मध्ये १४ भाविक जखमी झाले.
शनिवारी गुजरात राज्यातील भाविकांचा जत्था भंडारा जिल्ह्यातील मौदा येथुन नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात होता. दरम्यान भाविकांच्या ट्रॅव्हलर क्रमांक DD-03-W-9666 ने पुढे जात असलेल्या टिप्परला मागाहुन जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह १४ भाविक जखमी झाले असुन जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व शासकीय रुग्णालय वर्धा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील वडद येथील एकुण २२ भाविक ट्रॅव्हलरने माहुर येथे दर्शनासाठी जात होते. रमणा फाटा येथील भारतीय ढाब्यासमोर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हलरने पुढे चाललेल्या JH 05 TC 1851 क्रमांकाच्या टिप्परला पाठीमागुन जोरदार धडक दिली. टिप्पर हा जमशेदपुर येथुन गुजरातच्या गांधीबागला जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान डिझेल भरून वळण घेत असताना हा अपघात घडला. ही धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॅव्हलरचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी होत गाडीतच अडकुन पडला होता. त्याला मोठया प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. अपघातात ट्रॅव्हलरमधील १४ प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच सेलु पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतुन ग्रामीण रुग्णालय सेलु, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व शासकीय रुग्णालय वर्धा येथे हलविण्यात आले. यातील सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.सर्व जखमी गुजरात राज्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.


