स्मार्ट मिटर चा विरोध
आमदार रोहीत पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राहणार उपस्थित
विशेष प्रतिनिधी
हिंगणघाट
सक्तीच्या स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी हिंगणघाट शहरात सोमवारी (ता. २४ ऑगस्ट) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे आणि युवा नेते सलील देशमुख उपस्थित राहणार आहेत.
स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांकडुन करण्यात आला आहे. वीज बिलांबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असुन, स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
मोर्चापुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनआक्रोश सभा होणार असुन, त्यानंतर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. येथे निवेदन देऊन स्मार्ट मीटर सक्ती थांबविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात नागरिक, शेतकरी, व्यापारी, कामगार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात आले आहे.

