राजेश वरटकर
मुख्य संपादक
बोर व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांच्या हालचाली वाढल्या असुन प्रसिद्ध वाघीण ‘कॅटरिना’ची मुलगी ‘पिंकी’ आणि नात ‘लाली’ हिंगणी बफर क्षेत्रात सातत्याने दर्शन देत आहेत. विशेषतः १५ ऑगस्टपासून ‘लाली’चे या परिसरात वारंवार दर्शन होत असल्याने वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांचे लक्ष हिंगणीकडे वेधले गेले आहे.
घनदाट जंगल आणि पावसाळ्याचे आल्हाददायक वातावरण यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव हालचालींना वेग आला आहे. अशातच पिंकी आणि लाली या दोन्ही वाघिणी हिंगणी बफर क्षेत्रात स्वतंत्रपणे फिरताना दिसत आहेत. त्यांच्या दर्शनामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॅटरिना ही बोर व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण म्हणून ओळखली जाते. तिची मुलगी पिंकी आता पुर्णपणे प्रौढ झाली असून तिची मुलगी लालीही वयाने मोठी होत आहे. वनक्षेत्रात दोन्ही वाघिणी स्वतंत्रपणे वावरताना दिसत असल्याने बोरच्या जंगलातील वाघांच्या वाढत्या अधिवासाचे हे महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.
पावसाळ्यात सामान्यतः जंगलातील दाट वनस्पती आणि वाढलेली हिरवाई यामुळे वाघांचे दर्शन तुलनेने कठीण मानले जाते. मात्र, या काळातही पिंकी आणि लालीचे वारंवार दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. वन्यजीव छायाचित्रकारांसाठीही त्यांचे दर्शन आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
हिंगणी बफर क्षेत्रात या दोन्ही वाघिणींच्या हालचालींकडे वनविभागाचेही लक्ष असून, जंगल परिसरात वावरताना नागरिक व पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात बोरच्या जंगलात ‘पिंकी’ आणि ‘लाली’चा मुक्त संचार; हिंगणी बफर क्षेत्र बनले वन्यजीवप्रेमींचे आकर्षण!
