जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि काही क्षणांतच नवजात शिशु कक्ष धुराने भरून गेला. या हृदयद्रावक दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
आगीच्या वेळी कक्षात नऊ नवजात बालके होती. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाळांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. सहा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले; मात्र तीन चिमुकल्यांना वाचवता आले नाही. सहा बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दोन परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता वाचवली चिमुकली
आग आणि धुराचे लोट पसरले असतानाही दोन परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कक्षात धाव घेतली. त्यांनी अनेक बाळांना सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी प्रयत्नात त्यांच्या हातांनाही भाजल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू होऊन अवघे वर्षभर झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर अग्निरोधक यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत होती का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अमरावतीतील या दुर्घटनेने आरोग्य यंत्रणेतील अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
.

