पंढरपूर | विशेष प्रतिनिधी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी तुळशी अर्चन पूजा करण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
तुळशी अर्चन पूजेसाठी २१०० रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातील गर्दीचे तसेच सण-उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना ही पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भाविकांना पूजेची नोंदणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यासाठी मदत व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पूजेबाबतच्या अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
भाविकांनी नोंदणीची तारीख व वेळ लक्षात घेऊन ऑनलाइन नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

