चकलीत निघाले कॉपरचे तुकडे; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
विशेष प्रतिनिधी
वर्धा
सध्या श्रावण महिना सुरू आहे.त्यातच
सणासुदीचे दिवस सुरू असतानाच वर्धा शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्धेतील एका नामांकित हॉटेलमधुन खरेदी करण्यात आलेल्या चकलीच्या पॅकेटमध्ये प्लास्टिकसदृश तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असुन, संबंधित प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बडे चौकातील बालाजी स्वीट्स येथुन चकलीचे पॅकेट खरेदी करण्यात आले होते. पॅकेटमधील चकली खात असताना त्यामध्ये संशयास्पद प्लास्टिकचे तुकडे आढळुन आले. हा प्रकार लक्षात येताच संबंधित नागरिकांनी चकलीचे पॅकेट घेऊन दुकानदाराकडे धाव घेतली.
मात्र, या प्रकाराबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांनी चकलीचे पॅकेट बदलुन दिल्याची माहिती आहे. परंतु, पॅकेट बदलुन देणे म्हणजे गंभीर प्रकारावर पडदा टाकणे नव्हे, असा सवाल नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
*आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का?*
वर्धा शहरात अनेक हॉटेल, स्वीट्स मार्ट व खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन सातत्याने होत आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने गुणवत्तेची तपासणी अधिक कठोर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रकरणातील चकलीचा नमुना तपासणीसाठी घेण्यात येणार का? त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ मिसळले गेले होते? तसेच संबंधित हॉटेल अथवा दुकानाची अन्न सुरक्षा नियमांनुसार तपासणी होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एफडीएने तातडीने लक्ष घालावे.
चकलीत प्लास्टिकसदृश वस्तु आढळल्याच्या या गंभीर प्रकाराची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेऊन संबंधित दुकानाची चौकशी करावी, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश बसणार का? याकडे आता वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.

