२ सप्टेंबरला सेलुत धडक मोर्चा
वाढीव वीज बिलांचा जाब विचारणार; जुने मीटर पुन्हा बसविण्यासह ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन
शहर प्रतिनिधी
सेलु
स्मार्ट मीटरमुळे वाढत असलेल्या वीज बिलांचा विरोध तसेच ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने साहसिक जनशक्ती संघटना २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सेलु शहरात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सेलु बसस्थानकापासुन सुरू होऊन महावितरण कार्यालयावर धडकणार आहे.
साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार करणार आहेत. स्मार्ट मीटर बंद करून पुर्वीचे जुने मीटर पुन्हा बसवावेत, वाढीव वीज बिलांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, ग्राहकांवरील अन्याय तात्काळ थांबवावा तसेच वीज बिल निर्धारणाची प्रक्रिया पारदर्शक व न्याय करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहेत.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असुन, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर नागरिकांचा वाढता रोष आता रस्त्यावर उतरणार असुन, २ सप्टेंबरच्या मोर्चाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

