‘शेतीच संपवायची असेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे?’
जमीन संपादनापुर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवा; योग्य व न्याय्य मोबदला मिळाल्याशिवाय कार्यवाही नको!
खासदार अमर काळेंची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे ठाम मागणी
विशेष प्रतिनिधी
सेलु
सेलू तालुक्यातील मौजा परसोडी येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या जमीन संपादनाच्या प्रक्रियेवरून शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असुन, जमीन संपादनापुर्वी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या व अडचणी सोडवाव्यात, अशी ठाम मागणी पुढे आली आहे. शेतकऱ्यांनी खासदार अमर काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्यानंतर खासदार काळे यांनी थेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहुन शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देऊनच जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विविध महामार्गांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पिकाऊ शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः कापुस लागवडीखालील शेतीचे क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आता औद्योगिक वसाहतीसाठीही मोठ्या प्रमाणावर शेतीची जमीन संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विकास हवा; पण शेतकऱ्यांच्या हक्कांच्या किंमतीवर नको!
औद्योगिक विकासाला विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांचा बळी देता कामा नये, अशी भुमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्यावर दबाव आणु नये. प्रशासनाने थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या, अडचणी आणि अपेक्षा जाणुन घ्याव्यात आणि वाटाघाटीच्या माध्यमातुन पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उद्योगमंत्र्यांना खासदार काळेंचे पत्र
शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत खासदार अमर काळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठविले आहे. जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे संपुर्ण हक्क अबाधित ठेवावेत, कायद्यानुसार योग्य व न्याय्य मोबदला द्यावा आणि जमीन संपादनासंदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
‘शेतीच गेली तर शेतकरी काय करणार?’
वर्धा जिल्ह्यात आजही शेती हा नागरिकांचा प्रमुख व्यवसाय आहे. महामार्गांसाठी यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर पिकाऊ शेती संपादित झाली आहे. आता एमआयडीसीसाठीही शेतीची जमीन जाणार असल्याने भविष्यात शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी पुरेसे क्षेत्र शिल्लक राहील का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
परसोडी येथील जमीन संपादनाची प्रक्रिया पुढे नेण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. योग्य मोबदला, पुनर्वसन आणि सर्व कायदेशीर हक्क निश्चित झाल्यानंतरच जमीन संपादनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम मागणी खासदार अमर काळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
परसोडी एमआयडीसीचा विकास व्हावा; पण त्यासाठी शेतकऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये! योग्य मोबदला आणि हक्कांची हमी मिळाल्याशिवाय जमीन संपादन नको, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.

