सामाजिक वनीकरण विभागातील रोजंदारीवरील मजुरांचा संताप; नियमित वेतनाची मागणी
विशेष प्रतिनिधी
शिवशाही न्युज
सेलू येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांना त्यांच्या हक्काचे वेतन नियमितपणे मिळत नसल्याने मजुरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मजुरांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांना यापुर्वीच निवेदन देऊन नियमित वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही वेतनाचा प्रश्न सुटलेला नसल्याने मजुरांवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टपासुन मजुरांनी कामावर जाणे बंद केले असून, थकीत व नियमित वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील मजुरांना एमआरजीएस अंतर्गत ३१२ रुपये तसेच अधिसुचना योजनेनुसार २०२ रुपये रोजप्रमाणे५१४ रुपये मजुरी अपेक्षित आहे. मात्र, ही मजुरी त्यांना कथितपणे नियमित मिळत नसल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. काही महिन्यांपर्यंत ३१२ रुपयांची मजुरी मिळाली असली तरी जुन, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील मजुरी अद्यापही मिळालेली नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अधिसूचना योजनेत बदल करून ती ‘जिमझी’ योजनेत परावर्तित करण्यात आल्याने मजुरांच्या वेतनाचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याची चर्चा आहे. या योजनेअंतर्गत ३१२ ऐवजी ३१७ रुपये मजुरी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मजुरांना नियमित वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
मजुरांनी वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
यांनी केली मागणी
या मागणीसाठी अभय वासे, संगीता सहारे, शत्रुघ्न जुवारे, मीरा मलाठी, साधना महाले, सारिका मोरवाल, कल्पना कावळे, रेखा मरसकोल्हे सुरेश मसकोल्हे यांच्यासह इतर मजुरांनी मागणी केली आहे.

