जुवाडीच्या पुरातन शिवमंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवरुद्र पूजा, होमहवन व भव्य दिंडी; महाप्रसादाचे वितरण
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू तालुक्यातील माळरान डोंगराच्या कुशीत वसलेले आणि हिरवळीने नटलेले जुवाडी गाव येथील उंच टेकडीवर असलेल्या पुरातन शिवमंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारचे औचित्य साधून धार्मिक उत्साहात विविध कार्यक्रम पार पडले. गणेश चतुर्थीचेही औचित्य साधत दि. ३१ ऑगस्ट रोजी शिवरुद्र पूजा, होमहवन, भव्य दिंडी, काला व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
जुवाडी गावाच्या उंच टेकडीवर वसलेले हे पुरातन शिवमंदिर परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या कळसावरील मोठा घुमट अचानक कोसळून गावाच्या दिशेने घरंगळत आला आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात येऊन विसावला होता. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली होती. गावावर कोणते संकट तर येणार नाही ना, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.
मात्र, सुज्ञ ग्रामस्थांनी महादेवाला साकडे घालत मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्धार केला. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज या पुरातन शिवमंदिराचे रूप पूर्णतः पालटले असून मंदिराला नवसंजीवनी मिळाली आहे.
तेव्हापासून दरवर्षी गावातील नागरिक वर्गणीच्या माध्यमातून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. शिवरुद्र पूजा व होमहवनानंतर गावातून पारंपरिक दिंडी काढण्यात येते. त्यानंतर गडावर काला करण्यात येऊन मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सभागृहात भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येते.
या धार्मिक सोहळ्यात जुवाडी, धानोली (गा.), मेनखात, खैरी, नानबर्डी तसेच डोंगरगाव येथील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विणा, पखवाज, टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीने परिसर भक्तिमय झाला होता. नगर प्रदक्षिणेदरम्यान लोकगीते, भजने, गौळणी आणि भारुड सादर करण्यात आले. पारंपरिक संगीत आणि भक्तिरसाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन जुवाडी येथील वाघमारे कुटुंबीयांकडे असते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील विविध गावांतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
माळरानाच्या डोंगरात वसलेल्या पुरातन शिवमंदिराच्या साक्षीने ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पार पडलेला हा धार्मिक सोहळा जुवाडी परिसरातील श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवून गेला.

