राजेश वरटकर
मुख्य संपादक
आनंद आणि उत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, आज उत्सवाच्या नावाखाली सुरू झालेला डीजेचा कानठळ्या बसवणारा दणदणाट मनोरंजनापलीकडे जाऊन सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका बनला आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली वाढत चाललेला हा अतिरेक समाजाचा विवेक हरवत असल्याचे चित्र आहे.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवांची सुरुवात समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय एकतेसाठी केली होती. मात्र, आज पारंपरिक वाद्यांची जागा प्रचंड आवाजाच्या डीजेने आणि झगमगाटाच्या लेझर लाईट्सने घेतली आहे. हा केवळ सांस्कृतिक ऱ्हास नसुन आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेसमोर उभे राहिलेले गंभीर आव्हान आहे.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांविरुद्ध पुण्यात नुकतीच झालेली न्यायालयीन कारवाई हा संपुर्ण राज्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि मनोरंजनाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.
या विरोधातील लढ्यात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी उभारलेली मोहीम विशेष महत्त्वाची ठरते. ध्वनी प्रदुषण आणि लेझर लाईट्सविरुद्ध सनदशीर मार्गाने आवाज उठविणाऱ्या एका सामान्य नागरिकावर हल्ला होणे ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. समाजहितासाठी लढणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता प्रशासनाने स्वीकारली पाहिजे.
डीजेचा प्रचंड आवाज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. कानांना कायमस्वरूपी इजा, रक्तदाब वाढणे आणि मानसिक तणाव यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. शांततेत जगण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाच्या जगण्याच्या अधिकाराचाच महत्त्वाचा भाग आहे.
पुर्वीच्या उत्सवात नाद होता, पण गोंगाट नव्हता; आनंद होता, पण दुसऱ्याला त्रास नव्हता. आज मात्र, “माझा सण, माझा आनंद” या स्वार्थी मानसिकतेतुन दुसऱ्यांच्या आरोग्याचा विचारच केला जात नाही.
नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणी प्रशासनाने डीजेच्या अतिरेकावर कठोर भुमिका घेण्याची वेळ आली आहे. कायदे केवळ कागदावर राहुन उपयोग नाही; त्यांची कठोर आणि निष्पक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे.
खरा उत्सव माणसांना जोडतो, आनंद देतो आणि संस्कृती जपतो. माणसांचे आरोग्य धोक्यात घालणारा आणि जीवघेणा ठरणारा दणदणाट हा उत्सव नव्हे
तो सामाजिक असंवेदनशीलतेचा आवाज आहे. आता समाजाने आणि प्रशासनाने मिळुन हा आवाज थांबविण्याची वेळ आली आहे.

