प्रमाणपत्राच्या नावाखाली १० हजारांची कथित वसुली; ‘डॉक्टरांच्या नावावर’ ५ हजार, नंतर पुन्हा ५ हजार! ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सेलुत खळबळ
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू : शासनाच्या योजनांचा आधार मिळावा, या आशेने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी धडपडणाऱ्या एका असहाय्य दिव्यांगाच्या मजबुरीचाच कथित गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार सेलुत समोर आला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र व त्यासंबंधित प्रक्रिया करून देण्याच्या नावाखाली तब्बल १० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला असुन, त्यानंतरही पैशांसाठी तगादा लावला जात असल्याचे संबंधित दिव्यांगाने सांगितले आहे. त्यातच या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितली जाणारी ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सेलु येथील संजय कळसाईत यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांना चालणेही कठीण झाले आहे. काम करण्याची क्षमता कमी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि उपचारांचा खर्च भागविण्याचे संकट त्यांच्यासमोर आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्यास शासनाच्या विविध योजना व आर्थिक मदत मिळु शकते, या अपेक्षेने त्यांनी प्रमाणपत्रासाठी प्रयत्न सुरू केले.
याचदरम्यान सेलुतील मिश्रा नामक व्यक्ती दिव्यांग प्रमाणपत्राचे काम करून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळसाईत यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना वर्धा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या नावावर ५ हजार रुपये मागण्यात आले आणि आपण ही रक्कम दिल्याचा आरोप कळसाईत यांनी केला आहे.
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया आणि ‘केस करण्याच्या’ नावाखाली पुन्हा ५ हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. म्हणजेच प्रमाणपत्राच्या नावाखाली एकुण १० हजार रुपये घेतल्याचे कळसाईत यांचे म्हणणे आहे.
१० हजारांनंतरही ‘तगादा’ सुरू?
धक्कादायक बाब म्हणजे एवढी रक्कम दिल्यानंतरही आणखी १ हजार रुपयांसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप आहे. शासनाकडुन दरमहा अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतरही फोन करून पैशांची मागणी होत असल्याचे कळसाईत यांनी सांगितले. आधीच अर्धांगवायुमुळे त्रस्त असलेल्या या दिव्यांगावर पैशांच्या सततच्या मागणीमुळे मानसिक तणाव वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या नावाखाली नेमका काय ‘खेळ’?
सेलू शहरातील बाजार रोड परिसरात भाड्याच्या खोलीत कार्यालय थाटुन दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रमाणपत्र काढुन देणे आणि शासकीय कामे करून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्ती दिव्यांग संघटनेचा तालुका पदाधिकारी असल्याचे सांगत असल्याचाही आरोप आहे.
संघटनेच्या नावाचा वापर करून शासकीय यंत्रणेवर दबाव आणला जातो का? दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत मध्यस्थ म्हणुन आर्थिक व्यवहार केले जातात का? ‘डॉक्टरांच्या नावावर’ घेतलेली रक्कम नेमकी कुठे जाते? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला शोधावी लागणार आहेत.
व्हायरल ऑडिओने वाढवले प्रकरणाचे गांभीर्य
या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा ऑडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यातील संभाषणाची सत्यता अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसली तरी त्यामध्ये पैशांच्या व्यवहारासंदर्भात चर्चा असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ऑडिओची तांत्रिक तपासणी करून सत्यता पडताळण्याची मागणी होत आहे.
दिव्यांगांच्या हक्कांवरच ‘दलाली’चा डल्ला?
दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा उद्देश त्यांना आर्थिक व सामाजिक आधार देणे हा आहे. मात्र, याच योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या नावाखाली असहाय्य व्यक्तींकडुन पैसे उकळले जात असतील, तर हा प्रकार केवळ आर्थिक व्यवहाराचा नसुन दिव्यांगांच्या हक्कांवरच घाला घालणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून व्हायरल ऑडिओची सत्यता, पैशांचे व्यवहार, प्रमाणपत्राची प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे आणि शासकीय यंत्रणेशी असलेले संबंध तपासावेत. आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित व्यक्तीची अधिकृत बाजु अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या चौकशीनंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

