सायंकाळी साडेचारच्या सुमारास थरारक घटना; परिसरात भीतीचे वातावरण
सेलू तालुका | प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील रायपुर जंगल परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात भगवान धुर्वे (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रायपुरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भगवान धुर्वे हे परिसरात असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. रायपुर जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
वाघाचा वावर वाढला; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
रायपूर जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे. वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
वनविभाग आता कोणती ठोस पावले उचलणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

