श्री संत केजाजी महाराजांच्या काळापासुन अखंड सुरू असलेला घोराडचा अनोखा बैलपोळा; मंदिरासमोर रंगतो एकमेव नंदी पोळा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
श्रद्धा, परंपरा आणि शेतकरी संस्कृतीचा अनोखा संगम असलेला श्री क्षेत्र घोराडचा बैलपोळा यंदाही विशेष आकर्षण ठरणार आहे. संत केजाजी महाराजांच्या काळापासुन तब्बल दोनशे वर्षांपासुन अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही घोराडकरांनी तितक्याच भक्तिभावाने जपली आहे. ‘एक गाव, एक बैलपोळा’ हे घोराडच्या पोळ्याचे वैशिष्ट्य असुन, श्री संत केजाजी महाराज मंदिरासमोर एकच नंदी पोळा भरतो.
श्रावण महिनाभर श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरू असलेल्या अखंड वीणेचा नाद पोळ्याच्या दिवशी भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. दुपारी चार वाजता मंदिरातुन दिंडी निघते. बोर नदीच्या तीरावरून दिंडी संत नामदेव महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात पोहोचते. तेथे बैलजोड्यांच्या पाच फेऱ्या मारल्या जातात.
यानंतर मानाच्या पाच बैलजोड्यांचे पुजन करून शेतकऱ्यांना नारळ, पान व दुपट्टा देऊन सन्मान केला जातो. संत नामदेव महाराज मंदिरासमोर आरती झाल्यानंतर परंपरेनुसार न्हावी समाजातील नक्षीणे परिवारातील सदस्य मशाल पेटविताच पोळा फुटतो. त्यानंतर सजविलेल्या बैलजोड्या पुजनासाठी घरोघरी जातात.
परंपरा पाहण्यासाठी विदर्भातुन गर्दी
धार्मिक श्रद्धेसोबतच शेतकरी जीवनाशी घट्ट नाते सांगणारा घोराडचा हा पोळा पाहण्यासाठी विदर्भाच्या विविध भागांतुन नागरिक व भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. अखंड वीणेचा नाद, दिंडी, मानाच्या बैलजोड्या, मशालीची परंपरा आणि मंदिरासमोरील नंदी पोळा या सर्वांमुळे घोराडचा बैलपोळा विदर्भातील आगळेवेगळे धार्मिक-सांस्कृतिक आकर्षण ठरला आहे.
दोनशे वर्षे उलटली; पण परंपरेचा नाद आजही तितकाच जिवंत!

