२००३ पासुनची परंपरा कायम; बक्षिसांचे रस्त्यावरच वाटप, आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
विशेष प्रतिनिधी
सिन्दी रेल्वे
सिंदी रेल्वे : शहरातील पारंपरिक तान्ह्या पोळ्याचा उत्साह यंदाही पाहायला मिळाला. लहान मुलांनी सजविलेल्या आकर्षक नंदींसह पोळ्यात सहभाग घेतला. मात्र, उत्साहाच्या या सोहळ्याला ढिसाळ नियोजनाची किनार लाभल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
सिंदी रेल्वे येथे सन २००३ पासुन आनंद छाजेड मित्रपरिवाराच्या वतीने तान्ह्या पोळ्याचे आयोजन केले जात होते. गेल्या तीन वर्षांपासुन नगरसेवक आशीष देवतळे व मित्रपरिवाराच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. अनेक वर्षांची ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.
मात्र, कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सहभागी नागरिकांमध्ये नाराजी दिसुन आली. विशेषतः बक्षीस वितरणासाठी स्टेजची व्यवस्था असतानाही बक्षिसे स्टेजवर न देता थेट रस्त्यावरच वाटप करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या मुलांना व पालकांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला.
परंपरा आणि मुलांचा उत्साह जपणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. तान्ह्या पोळ्याचा उत्साह कायम असला तरी आयोजनातील त्रुटींमुळे आयोजकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली.



