आविष्कार संशोधन अधिवेशनात सलग दोन वर्षे राज्यस्तरीय निवड; संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे : येथील स्थानिक शिक्षक कै. पुरुषोत्तम बोरीकर यांचे धाकटे चिरंजीव डॉ. सचिन बोरीकर यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून सिंदी रेल्वेच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. बुलढाणा येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी येथे कार्यरत असलेल्या डॉ. बोरीकर यांच्या पीएच.डी. संशोधनाचा Viva-Voce व Open Defense कार्यक्रम ७ सप्टेंबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडला.
डॉ. सचिन बोरीकर यांनी “Neuropsychopharmacological Evaluation of SGLT2-Inhibitors in Diabetic Rodents” या विषयावर संशोधन केले. मधुमेहावरील औषधांचा मेंदु व वर्तनाशी संबंधित परिणामांचा अभ्यास करणाऱ्या या संशोधनातुन त्यांनी फार्मास्युटिकल सायन्सेसच्या क्षेत्रात महत्त्वपुर्ण योगदान दिले.
सन २०२२ मध्ये पीएच.डी. संशोधनाला सुरुवात केलेल्या डॉ. बोरीकर यांचे संशोधनपर लेख विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. Elsevier, Springer Nature, Taylor & Francis आणि Bentham Science यांसारख्या नामांकित प्रकाशकांच्या जर्नल्समध्ये त्यांच्या संशोधनाची नोंद झाली आहे.
आविष्कारमध्ये सलग दोन वर्षे राज्यस्तरीय निवड
डॉ. बोरीकर यांच्या संशोधन प्रवासातील विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे २०२४ आणि २०२५ या सलग दोन वर्षांत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय आविष्कार संशोधन अधिवेशनात सहभाग. सलग दोन वर्षे राज्यस्तरावर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची पावती मानली जात आहे.
या संशोधन प्रवासात राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा येथील प्राचार्य तथा मार्गदर्शक डॉ. शिरीष जैन तसेच महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या यशाचे श्रेय डॉ. सचिन बोरीकर यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबीयांचे सहकार्य, मार्गदर्शक, सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवाराला दिले.
ग्रामीण भागातुन पुढे येत संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सचिन बोरीकर यांच्या यशाबद्दल सिंदी रेल्वेसह परिसरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, नातेवाईक व मित्रपरिवाराकडुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

