पूर्व विदर्भ उपपीठातुन हजारो वारकऱ्यांचा सहभाग; २१ ऑक्टोबरला श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे होणार समारोप
राजेश वरटकर
मुख्य संपादक
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजीक बांधिलकीचा संदेश घेऊन निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ चे शुक्रवार दि.११ ला श्रीक्षेत्र मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपुर येथील रामानंद संप्रदायाच्या पुर्व विदर्भ उपपीठातुन प्रस्थान झाले.
या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले असुन नागपुर ते रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम असा बाराशे किलोमीटरचा प्रवास ते पायी करणार आहेत. दिंडीच्या माध्यमातुन ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे.
दिंडीच्या मार्गावर दररोज वृक्षारोपण केले जात असुन कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र स्वच्छता पथक, टॉयलेट व्हॅन तसेच पिण्याचे व स्वच्छतेसाठी दोन स्वतंत्र पाण्याचे टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकही दिंडीसोबत आहे.
दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध नियोजन. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वारकरी रस्त्याच्या एका बाजुने रांगेत मार्गक्रमण करीत आहेत. यात्रेकरूंची उपस्थिती दिवसातुन पाच वेळा ॲप व क्युआर कोडच्या माध्यमातुन नोंदविली जात आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा ६०वा वाढदिवस २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे साजरा होणार असुन, विविध उपपीठांतुन निघालेल्या वसुंधरा पायी दिंड्या याच दिवशी नाणीजधाम येथे एकत्रित होणार आहेत.

