राजेश वरटकर
मुख्य संपादक
श्री क्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज भक्त निवासात मुक्काम केल्यानंतर वसुंधरा दिंडीने आज सकाळी सहा वाजता वाजत-गाजत वर्धेकडे प्रस्थान केले. टाळ-मृदंगाचा गजर, रामनामाचा जप आणि भक्तांच्या जयघोषाने दिंडीचा मार्ग भक्तिमय झाला होता.
दिंडीच्या मार्गावर विशेष आकर्षण ठरत आहे ते गाडीवरून दिले जाणारे पर्यावरण संवर्धनाचे संदेश आणि सतत सुरू असलेला रामनाम जप. ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण जपा’ अशा संदेशातून पर्यावरण संरक्षणाचा जागर करण्यात येत असून, भक्तीबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय जनजागृतीचा संदेशही दिंडी देत आहे.
रमणा फाटा येथे दिंडीतील रथातील पादुकांचे पुजन व आरती अन्नदाते यजमानांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. स्थानिक भाविकांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी नाश्ता व सरबताचे वितरण करण्यात आले.
वर्धा येथे पोहोचल्यानंतर नालवाडी परिसरातील मोतीमहल पॅलेस येथे दिंडीतील भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. अन्नदानानंतर विश्रांती घेऊन दिंडीने पुन्हा पुढील प्रवासाला सुरुवात केली.
भक्ती, सेवा, रामनामाचा जप आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन वसुंधरा दिंडीचा प्रवास सुरू असुन, आज सालोड येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. मार्गात ठिकठिकाणी भाविकांकडुन दिंडीचे स्वागत व सेवा केली जात असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


