राज्य सरकारने विशेष निधी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या ; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची मागणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे : विदर्भातील ऐतिहासिक आणि पारंपरिक सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळ्याला राज्य सरकारने ‘सांस्कृतिक महोत्सव’ म्हणुन अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवारचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे.
सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळ्याला तब्बल १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, शेतीशी आणि शेतकरी जीवनाशी घट्ट जोडलेला हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने सजविलेले बैल, विविध देखावे, झांकी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग. त्यामुळे हा केवळ स्थानिक उत्सव न राहता विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा सोहळा ठरला आहे.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सिंदी रेल्वे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतुन नागरिक हा ऐतिहासिक पोळा पाहण्यासाठी येतात. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही नव्या पिढीपर्यंत पोहोचत असुन, ग्रामीण संस्कृती आणि लोकपरंपरा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उत्सवाच्या माध्यमातून होत आहे.
या ऐतिहासिक परंपरेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. सिंदी रेल्वेच्या तान्हा पोळ्याला ‘सांस्कृतिक महोत्सव’ म्हणुन मान्यता मिळाल्यास या उत्सवाला राज्यस्तरीय ओळख मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या नकाशावर सिंदी रेल्वेचे नाव अधिक ठळकपणे पुढे येण्यास मदत होईल.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, तान्हा पोळ्याच्या आयोजनासाठी दरवर्षी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात आणि उत्सवाच्या प्रसिद्धीसाठी शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विशेष उपक्रम राबवावेत.
तसेच या उत्सवाला व्यापक स्वरूप देताना स्थानिक लोककला, पारंपरिक वाद्ये, ग्रामीण हस्तकला, शेतकरी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विविध लोकपरंपरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात यावे. त्यामुळे नवीन पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख होईल आणि स्थानिक कलाकार व कारागिरांनाही रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.
सिंदी रेल्वेच्या तान्हा पोळ्याला सांस्कृतिक महोत्सवाचा दर्जा मिळाल्यास वर्धा जिल्ह्याच्या पर्यटनालाही चालना मिळु शकते. बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने विशेष नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
१५० वर्षांची परंपरा असलेल्या या ऐतिहासिक उत्सवाला केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय सांस्कृतिक ओळख मिळवुन देणे ही काळाची गरज आहे. सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा हा विदर्भाच्या समृद्ध ग्रामीण संस्कृतीचा ठेवा असुन, त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवारचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे

