हरतालिका व गणेश चतुर्थीचा दुर्मीळ योग; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषात स्वागत
राजेश वरटकर
मुख्य संपादक
श्रावण सरताच वेध लागतात ते भाद्रपदातील लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनाची चाहूल लागताच अवघ्या राज्याचे रूप पालटून जाते. घराघरांत तयारीची लगबग, बाजारपेठांमध्ये उत्साह आणि सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात यंदाचा गणेशोत्सव सुरू झाला आहे.
यंदाच्या उत्सवाला दुर्मीळ योगाची किनार लाभली आहे. तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका व्रत आणि श्रीगणेश चतुर्थीचा योग एकाच दिवशी आल्याने भक्तांच्या उत्साहाला विशेष उधाण आले. पहाटे महिलांनी हरतालिका व्रत श्रद्धेने केले, तर त्यानंतर घराघरांत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू झाली. उपवासाचे पावित्र्य आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद असा दुहेरी सोहळा यंदा अनुभवायला मिळाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेश आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कुठे पारंपरिक पालखी, कुठे सजवलेले रथ, तर कुठे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत उत्सवाचा सांस्कृतिक बाज अधिक खुलविण्यात आला. ढोल-ताशे, टाळ-मृदंग आणि संबळाच्या निनादाने वातावरण भक्तिमय झाले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत. कृषी संस्कृती, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन यांसह सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांतून उत्सवाला विधायक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे.
गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकतेचे दर्शन. जात, पात, आर्थिक स्तर यापलीकडे जाऊन विविध समाजघटक बाप्पाच्या उत्सवात सहभागी होत आहेत.

