कै. मनोज कामतवार यांच्या कुटुंबाला ४४ लाखांची मदत
संघटनेच्या पाठपुराव्याला यश; अपघाती विमा योजनेतून आर्थिक आधार
विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
पोलीस पाटलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपुर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या अपघाती विमा योजनेचा पहिला प्रत्यक्ष लाभ कै. मनोज कामतवार यांच्या कुटुंबाला मिळाला आहे. अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेतून ४४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
कै. मनोज कामतवार यांचे ९ मे २०२६ रोजी अपघाती निधन झाले होते. पोलीस पाटलांसाठी असलेल्या या विमा योजनेनुसार अपघाती मृत्यु झाल्यास ४० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. यासोबत दोन अपत्ये असल्यास त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी २ लाख रुपये, असा एकूण ४ लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळतो.
कामतवार यांच्या दोन मुलांपैकी एकाचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक, तर दुसऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने कुटुंबाला विमा व शैक्षणिक लाभासह एकूण ४४ लाख रुपयांची मदत मिळाली.
विमा दावा प्रक्रियेसाठी पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून दावा दाखल करण्यात आला. त्यानंतर विमा कंपनीकडुन दावा मंजुर करण्यात आला. संघटनेच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश पोलीस पाटील कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण ठरले आहे.
विमा योजनेमुळे कुटुंबाला मोठा आधार
पोलीस पाटील हे ग्रामीण भागात प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा म्हणुन काम करतात. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा पहिलाच प्रत्यक्ष लाभ ४४ लाख रुपयांच्या स्वरूपात मिळाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

